शहरात ख्रिसमसचा उत्साह; घरोघरी केक कापून ख्रिसमस साजरा, चर्चमध्ये प्रार्थना

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो):  शहरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील छावणी परिसर, नगरनाका, सेव्हन हिल, सिडको यासह विविध भागांतील चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचे घेण्यात आल्या. मध्यरात्री प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मानिमित्त प्रार्थना करून केक कापण्यात आला. यावेळी मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत सणाला सुरुवात झाली.

आज सकाळपासूनच चर्चमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभू येशूंच्या जीवनावर आधारित देखावे उभारण्यात आले. आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि भव्य ख्रिसमस ट्रीने चर्च परिसर सजवण्यात आला. तसेच घरोघरी देखील ख्रिसमस ट्री सजवून सण साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांसाठी खास खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले होते. सांता क्लॉजच्या वेशभूषेत आलेल्या व्यक्तींनी मुलांना गिफ्ट व चॉकलेट वाटून आनंद द्विगुणित केला. सांताचे आगमन हे लहानग्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. शहरातील घराघरांमध्येही ख्रिसमसचा उत्साह दिसून आला. नागरिकांनी एकमेकांना घरी आमंत्रित करून केक, गिफ्ट आणि चॉकलेट देत ख्रिसमस सण साजरा केला. सायंकाळी अनेक ठिकाणी सांता क्लॉजच्या वेशात तरुण मंडळी घरोघरी जाऊन शुभेच्छा देण्याची तयारी करण्यात येत आहे. याशिवाय हॉटेल, मॉलमध्ये देखील ख्रिसमस च्या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच छावणी क्राईस्ट चर्च येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. एकूणच छत्रपती संभाजीनगर शहरात ख्रिसमस सण शांतता, आनंद, बंधुभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रभू येशूंच्या प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या सणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजात पोहोचवण्यात आला. अशी माहिती फादर विनोद शेळके यांनी दिली.

जिंगल बेलच्या सुरांनी शहर दुमदुमले

ख्रिसमस निमित्ताने आज शहरात मोठा उत्साह असून चैतन्यमय वातावरणात ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज घरोघरी जिंगल बेलचा आवाज घुमला. याशिवाय विविध ख्रिसमस गीतांच्या मधुर सुरांनी संपूर्ण शहर आनंदमय वातावरणात न्हाहून निघाले. घरोघरीच नव्हे तर अनेकांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यातही जिंगल बेलचा आवाज घुमला.

घरोघरी मोठा उत्साह

शहरात मोठ्या उत्साहात आज ख्रिसमस सण साजरा केला जात असून अनेकांनी घरोघरी देखील प्रभू येशूच्या जीवनावर प्रकाश टाकणारे देखावे सादर केले. तसेच घरोघरी यावेळी ख्रिसमस ट्री सजावट करून आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. घरोघरी आज केक कापून ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. तसेच एकमेकांना घरी आमंत्रित करून चॉकलेट, गिफ्ट देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मेरी ख्रिसमस असा जयघोष करण्यात आला. याशिवाय अनेकांनी सोशल मीडियावर देखील मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर देखील शुभेच्छाचा वर्षाव झाला.